Friday, 20 October 2017

दिनदर्शिका


शनिवार२१ऑक्टोबर २०१७
 
तिथि : शके १९३९कार्तिकA शुक्लपक्ष द्वितीया

सुर्योदय : ६:२६ म. पू.सुर्यास्त : ५:४४ म. नं.
-: आजचा सुविचार :-तारुण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचना काळ होय.
-: आजचे पंचांग :-मास : कार्तिकA • पक्ष : शुक्लपक्ष • तिथि : द्वितीयायोग : प्रीति • कारण : बालव • नक्षत्र : स्वाति
राहुकाल ९:१६ म. पू. - १०:४० म. पू.
 
यमगण्ड १:३० म. नं. - २:५५ म. नं.
कुलिक ६:२६ म. पू. - ७:५१ म. पू.
 
अभिजित ११:४३ म. पू. - १२:२८ म. नं.
दुर्मुहूर्त ६:२६ म. पू. - ७:११ म. पू., ७:११ म. पू. - ७:५७ म. पू.

Thursday, 19 October 2017

बलीप्रतिपदा

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा):-
                                              कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.
            साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला 'शुभा' असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस.
                 पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात. खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.
           घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच 'दिवाळसण' म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात.

पाडव्याचा मुहूर्त : स. 06.37 ते 08.55 / संध्या. 03.49 ते 06.08 वाजता.

दिनदर्शिका


शुक्रवार२०ऑक्टोबर २०१७
 
तिथि : शके १९३९कार्तिक शुक्लपक्ष प्रतिपदा

सुर्योदय : ६:२६ म. पू.सुर्यास्त : ५:४५ म. नं.
-: आजचा सुविचार :-मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
-: आजचे पंचांग :-मास : कार्तिक • पक्ष : शुक्लपक्ष • तिथि : प्रतिपदायोग : विश्कम्भ • कारण : किम्स्तुग्न • नक्षत्र : चित्रा
राहुकाल १०:४० म. पू. - १२:०५ म. नं.
 
यमगण्ड २:५५ म. नं. - ४:२० म. नं.
कुलिक ७:५० म. पू. - ९:१५ म. पू.
 
अभिजित ११:४३ म. पू. - १२:२८ म. नं.
दुर्मुहूर्त ८:४१ म. पू. - ९:२७ म. पू., १२:२८ म. नं. - १:१३ म. नं.

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन - आख्यायिका व महत्व:

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते.  अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.


प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.

लक्ष्मी पुजेसाठीचा मुहूर्त : संध्या. 06.08 ते 08.38 वाजता.

दिनदर्शिका


गुरुवार१९ऑक्टोबर २०१७
 
तिथि : शके १९३९आश्विन कृष्णपक्ष अमावास्या

सुर्योदय : ६:२५ म. पू.सुर्यास्त : ५:४६ म. नं.
-: आजचा सुविचार :-परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील तर मी परमेश्वरालाच मानणार नाही.
-: आजचे पंचांग :-मास : आश्विन • पक्ष : कृष्णपक्ष • तिथि : अमावास्यायोग : वैध्रुथि • कारण : चतुश्पाद • नक्षत्र : हस्त
राहुकाल १:३१ म. नं. - २:५६ म. नं.
 
यमगण्ड ६:२५ म. पू. - ७:५० म. पू.
कुलिक ९:१५ म. पू. - १०:४० म. पू.
 
अभिजित ११:४३ म. पू. - १२:२८ म. नं.
दुर्मुहूर्त १०:१२ म. पू. - १०:५७ म. पू., २:४४ म. नं. - ३:३० म. नं.

Wednesday, 18 October 2017

नरक चतुर्दशी

पराक्रमाचे स्मरण 'नरक चतुर्दशी'



दिवाळी पू्र्वी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पौराणिक संदर्भांच्या आधारे ग्रामीण संस्कृतीत नरक चतुर्दशीला आजही विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते.

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही, असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले.


नरकासुराने अश्या एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अशाच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती.

या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या 16,100 कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते.

सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची (पणती लावण्याची ) प्रथा आहे असे मानले जाते. वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेवून त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.

दिनदर्शिका

बुधवार१८ऑक्टोबर २०१७
 
तिथि : शके १९३९आश्विन कृष्णपक्ष चतुर्दशी

सुर्योदय : ६:२४ म. पू.सुर्यास्त : ५:४७ म. नं.
-: आजचा सुविचार :-संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव!!
-: आजचे पंचांग :-मास : आश्विन • पक्ष : कृष्णपक्ष • तिथि : चतुर्दशीयोग : इन्द्र • कारण : विस्टि/भद्र • नक्षत्र : उत्तरफाल्गुनी
राहुकाल १२:०६ म. नं. - १:३१ म. नं.
 
यमगण्ड ७:५० म. पू. - ९:१५ म. पू.
कुलिक १०:४० म. पू. - १२:०६ म. नं.
 
अभिजित NIL
दुर्मुहूर्त ११:४३ म. पू. - १२:२८ म. नं.

Tuesday, 17 October 2017

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी म्हणजे काय?


आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते.

सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या -चांदीने दिपतात. या कारणास्तव यम यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी अख्यायिका प्रचलित आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.


धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे. त्या दिवसास 'धन्वंतरी जयंती' असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. या दिवशी लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. वैद्य लोक या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. या दिवसापासून घरांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे.

लक्ष्मीची / धनाची पूजा मुहूर्त : संध्या. 6:10 ते 8:39 वाजता.

दिनदर्शिका

मंगळवार १७ ऑक्टोबर २०१७



तिथि : शके १९३९ आश्विन कृष्णपक्ष त्रयोदशी


सुर्योदय : ६:२४ म. पू.सुर्यास्त : ५:४८ म. नं.

-: आजचा सुविचार :-मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

-: आजचे पंचांग :-मास : आश्विन • पक्ष : कृष्णपक्ष • तिथि : त्रयोदशीयोग : भ्रह्म • कारण : गरिज • नक्षत्र : उत्तर